मुतखडा - Kidney Stones in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

November 08, 2018

March 06, 2020

मुतखडा
मुतखडा

सारांश

आपले मूत्रपिंड म्हणजे शरिराला आतून स्वच्छ करणारे, विषारी व निरुपयोगी घाण बाहेर फेकणारे अवयव आहेत. मात्र हीच स्वच्छतेची क्रिया त्यावेळी अतिशय त्रासदायक होते जेव्हा एक किंवा दोन्ही मूत्रपिंडांमध्ये काही कडक खडे बनतात. मूत्रपिंडांतील खडे गंभीर नसले तरी वेदनादायी असतात. हा प्रकार स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. किडनी स्टोन अथवा मूत्र खडे हे छोट्या मोठ्या आकाराच्या दगडांप्रमाणे असतात. त्यांच्या आकार, नैसर्गिक घटक द्रव्य आणि रंगांमध्ये वैविध्य आढळते. काही खनिजांच्या एकाच ठिकाणी साचत जाण्यामुळे हे खडे निर्माण होतात. शरीरातील कॅलशियम, युरिक ऍसिड किंवा स्ट्रुव्हाईट या घटकांची मात्रा वाढल्यामुळे किंवा सिस्टीन ऍसिडच्या गळतीमुळे- सिस्टीनुरिया मुळे- ही साचण्याची प्रक्रिया घडते.

वारंवार लघवी लागणे, त्यातही प्रत्येकवेळी थोडीशीच लघवी होणे, लघवीचा रंग आणि वास बदलणे या दृश्य बदलांवरुन खडे तयार झाले आहेत हे कळू शकतं. सोबतच कमरेत मागच्या बाजूला, ओटीपोटात, मांडीच्या सांध्यात आणि आजूबाजूला वेदना जाणवतात. ऍसिड आणि खनिजांच्या वाढलेल्या पातळीसोबतच आणखी अन्य वैद्यकीय कारणंही या खड्यांच्या निर्मितीला कारणीभूत ठरू शकतात. जसे की हायपरपॅराथाईरॉयडीसम्, किडनीचे दुखणे, पचनसंस्थेचे विकार, लघवीच्या मार्गतले संसर्गदोष, ज्यामुळे मूत्र खडे निर्माण होण्याची शक्यता बळावते. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, संपूर्ण शारीरिक तपासणी, रक्त व लघवी तपासणी, क्ष-किरण तपासणी, अल्ट्रासोनोग्राफी आणि सी टी स्कॅन करून या खड्यांचे नीट अनुमान लावता येऊ शकते.

मुतखड्यांवर केले जाणारे उपाय त्यांच्या आकारावरून ठरतात. कधी केवळ लघवीमार्गे ते बाहेर निघून जाऊ शकतात, किंवा कधी ध्वनी लहरींचा मारा करून ते फोडले जाऊ शकतात, किंवा कधी शस्त्रक्रिया करून काढावे लागतात. मूत्र खडे होऊच नयेत यासाठी करता येण्यासारखे उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे, मीठ कमी खाणे आणि असे अन्नपदार्थ टाळणे की ज्यामुळे खनिज साचत जाण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. आजार उलटण्याची शक्यता जरी असली तरी अनुवंशिकता नसेल तर मूत्र खड्यांच्या संभाव्य चढउताराचे व कारणांचे पूर्वनिदान करणे चांगले असते. मूत्रपिंड खराब होणे, किंवा संसर्गदूषित होणे, लघवीचा मार्ग संसर्ग दूषित होणे, किडनी किंवा लघवीचा मार्ग अवरुद्ध होणे, लघवीतून रक्त येणे यासारख्या समस्या मूत्र खड्यांमुळे निर्माण होतात. 

मुतखडा ची लक्षणे - Symptoms of Kidney Stone in Marathi

मुतखडे लहान असतात तेव्हा त्यांचे कोणतेच लक्षण दिसत नाही. नंतर जेव्हा मूत्र खडा पुढे सरकायला लागतो, लघवी मार्गात येतो तेव्हा लक्षणे दिसायला लागतात. काही लक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील:

  • लघवीचा रंग लाल, गुलाबी किंवा दाट केशरी होणे.
  • वारंवार आणि तीव्रपणे लघवीला जावेसे वाटणे.
  • लघवीला उग्र वास येणे
  • प्रत्येक वेळी थोडी थोडी लघवी होणे.
  • लघवी करतांना लघवी मार्गात वेदना होणे. (अधिक वाचा- वेदनासहित लघवीची कारणे)
  • मळमळ वाटणे आणि उलटी होणे
  • कमरेच्या मागच्या खालच्या भागात आणि बाजूंच्या भागात दुखणे
  • मांडीच्या सांध्यात आणि ओटीपोटात दुखणे

वेदनेच्या कधी कळा येतात तर कधी लहरी येऊ शकतात. तसेच खडा जसा जसा जागा बदलतो, पुढे सरकतो तशी तशी वेदनेची जागा सुद्धा बदलते. तीव्र आणि सततची वेदना असेल तर लगेच वैद्यकीय मदत घ्यायला हवी.

मुतखडा चा उपचार - Treatment of Kidney Stone in Marathi

मुतखड्यांवरचे उपचार त्याच्या आकाराप्रमाणे वैविध्यपूर्ण असतात. बरेच डॉक्टर खडा लघवीमार्गे निघून जावा असा प्रयत्न करतात. विविध उपचारपद्धती खालीलप्रमाणे सांगता येतील:

लहान मुतखड्यांसाठी

यावरचा उपाय सोपा आहे. खूप पाणी प्या,जेणेकरून लघवीच्या प्रवाहासोबत हे खडे बाहेर पडतील असा उपाय डॉक्टर सांगतात. ही क्रिया करतांना दुखत असेल तर वेदनाशामक आणि खडा सहज निघायला मदत व्हावी यासाठी स्नायू शिथिल करणारी औषधं डॉक्टर देतात.

मोठ्या मुतखड्यांसाठी

मोठ्या मूत्रखड्यांच्या  उपचारासाठी काही वैद्यकीय प्रक्रिया कराव्या लागतात.

  • औषधोपचार
    मुतखड्यांच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर आणि रुग्णाच्या अवस्थेवर औषधोपचार अवलंबून असतात. या औषधांमुळे खड्यातील मीठ विरघळून जाते आणि खड्याचा आकार लहान होतो. काही काळात खडा लहान लहान होत जाऊन इतका लहान होतो की लघवीमार्गे सहज बाहेर पडतो.
  • शस्त्रक्रिया
    दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपीसारख्या उपायांद्वारे मागच्या बाजूने किडनी मध्ये घालून मूत्रखडा शास्त्रक्रियेद्वारा बाहेर काढला जातो. ही शस्त्रक्रिया भूल देऊन केली जाते. या शस्त्रक्रियेला पर्क्युटॅन्युस नेफ्रोलिथोटॉमी म्हटले जाते आणि त्यासाठी दवाखान्यात भरती होऊन काही दिवस तिथेच थांबावे लागते. 
  • स्कोप
    खडा मूत्रपिंडात किंवा लघवीमार्गात ठाण मांडून बसतो तेंव्हा याचा उपयोग करतात. एक बारीकशी नळी, ज्याचे टोक प्रकाशित असते, ती लघवीमार्गे आत घातली जाते. या नळीच्या साह्याने खडा कुठे आहे ते तर कळतेच शिवाय तो खडा बाहेर काढला जाऊ शकतो किंवा फोडला जाऊ शकतो. यासाठी त्या अवयवाच्या जागीच फक्त भूल दिली जाते. आणि रुग्ण ही क्रिया आटपून लवकर घरी जाऊ शकतो.
  • शॉक-वेव्ह पद्धत
    त्वचेद्वारे खड्यावर धक्का देऊ शकणाऱ्या लहरी पाठवल्या जातात, ज्यामुळे तो खडा फुटतो. यानंतर त्याचे तुकडे मूत्राद्वारे बाहेर पडतात. ही क्रिया तासभर चालू शकते आणि थोड्या वेदना देणारी असू शकते. प्रक्रिया पार पडल्यावर थोडी अस्वस्थता येते, भाजल्यासारखे वाटते आणि रक्तस्त्राव होतो.खडा बाहेर निघाल्यावर तपासणीसाठी पाठवावा जेणेकरून यापुढे घ्याव्या लागणाऱ्या औषधोपचाराची दिशा ठरवता यावी व रुग्णाच्या जीवनशैलीत काही बदल करून पुन्हा अशा खड्यांची निर्मिती थांबवता यावी, हे त्यामागील कारण असते..

जीवनशैली व्यवस्थापन

मुतखड्यांचे एक कटू सत्य हे आहे की त्यांच्या पुनर्निर्मितीचे प्रमाण फार अधिक आहे. त्यामुळे त्यावरील उपचारांची दिशाच फक्त महत्वाची नाही तर त्याची वेळ आणि उपचारानंतर रुग्ण कोणती जीवनशैली निवडतो, हे सुद्धा फार महत्वाचे आहे. दुरुस्त झाल्यानंतरच्या जीवनशैलीच्या योजना आणि निवडींबाबत खालील मुद्दे लक्षात घेण्यासारख्या आहेत.

  • जलपदार्थ खास करून पाणी मुबलक प्यावे.
  • पूर्वी जे खडे तयार झाले होते त्याप्रकारचे पुन्हा होऊ नयेत यासाठी जेवणात बदल करणे.
  • वय आणि उंची लक्षात घेऊन त्या प्रमाणात वजन ठेवणे.
  • रक्त आणि मुत्रांमधली खनिज व युरिक ऍसिडची पातळी सतत तपासणे.
  • लघवी मार्गात संसर्गदोष निर्माण होऊ नयेत यासाठी वैयक्तिक स्वच्छता पाळणे. कारण एकदा मुतखडे झाले की असा संसर्ग पुन्हा सहज होऊ शकतो.


संदर्भ

  1. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Definition & Facts for Kidney Stones
  2. U.S. Department of Health and Human Services. Chapter 9: Urinary tract stones. In: Litwin MS, Saigal CS, eds.Urinary Tract Stones
  3. Urology Care Foundation [Internet]. USA: American urological association; What are kidney stones?
  4. Sylvia C. McKean, John J. Ross, Daniel D. Dressler, Danielle B. Scheurer. Principles and Practice of Hospital Medicine. Second edition New-Delhi: ACP Publications; copyright © 2012.
  5. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Eating, Diet, & Nutrition for Kidney Stones
  6. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Diagnosis of Kidney Stones
  7. National Kidney foundation [Internet]. New York: National Kidney Foundation; Kidney Stone Treatment: Shock Wave Lithotripsy
  8. Johns Hopkins Medicine [Internet]. The Johns Hopkins University, The Johns Hopkins Hospital, and Johns Hopkins Health System; Kidney Stones

मुतखडा साठी औषधे

Medicines listed below are available for मुतखडा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for मुतखडा

Number of tests are available for मुतखडा. We have listed commonly prescribed tests below: